कोरोना लसीमुळे 'या' आजारांपासून मिळते संरक्षण !
कोरोना लसीमुळे तुमचे केवळ कोरोनापासूनच नाही तर त्याशिवायही इतर काही आजारांपासून संरक्षण होते, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनं लसीकरणाचे फायदे सांगितले आहेत. सध्या वेगवेगळ्या आजारांवर लस उपलब्ध आहे. लसीमुळे आजारांपासून संरक्षण मिळते, असं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. लस घेतल्यामुळे संरक्षण होणाऱ्या वीसहून अधिक आजारांची यादी व्हॅक्सिन वर्क #VaccineWorks या हॅशटॅगसह जागतिक आरोग्य संघटनेनं जाहीर केली आहे. त्यामुळे लस घेण्यास घाबरु नका, कोणतेही गैरसमज बाळगू नका आणि लवकरात लवकर लसीकरण करावे, असे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने केले आहे.
1. हिपॅटायटीस बी ( Hepatitis B )
हिपॅटायटिस विषाणू ने पसरणार असं इन्फेक्शन आहे जे थेट लिव्हरला प्रभावित करतं. सामान्यपणे हे पाच प्रकारचं असत. यांना ए, बी, सी, डी आणि ई म्हटलं जात. सध्या जगभरात सर्वात जास्त लोक हेपेटायटिस-बी आणि हेपेटायटिस-सी चे शिकार आहेत.
हेपेटायटिस बी एचआयव्हीच्या तुलनेत ५० ते १०० टक्के अधिक घातक असतो. कारण हिपॅटायटिस-बी चा विषाणू शरीराच्या बाहेरही कमीत कमी सात दिवसांपर्यंत जिवंत राहून निरोगी व्यक्तीला प्रभावित करु शकतो. पण वेळेवर जर या आजाराच्या लक्षणांची ओळख पटवली तर, जीव वाचू शकतो. हिपॅटायटिसचे जेवढे घातक व्हायरस आहे त्यातील व्हायरस बी सर्वात घातक मानला जातो.
2. गोवर ( Measles )
गोवर हा विषाणूंमुळे होणारा श्वसनसंस्थेचा (Respiratory System) संसर्गजन्य रोग आहे. जगभर या रोगाच्या साथी दिसून येतात. मुख्यत्वे हा रोग लहान मुलांमध्ये ( Children) आढळतो; परंतु काही वेळा प्रौढांनाही होऊ शकतो. एकदा हा रोग होऊन गेल्यावर सहसा पुन्हा होत नाही.
जंतु संसर्ग झालेल्या व्यक्तीस ताप, खोकला व अंगावरील पसरत चाललेले लाल पुरळ यामुळे अतिसार व न्युमोनिया यांची दुय्यम बाधा होऊन मृत्यु ओढवू शकतो. त्याचे जंतु बाधित व्यक्तीच्या नाका तोंडात तसेच घशात (Throat) आढळतात. निरोगी आणि धडधाकट मुलांना याचा विशेष त्रास होत नाही. कुपोषणामुळे (Malnutrition) देशात गोवराचे अनेक दुष्परिणाम होतात आणि मृत्यूही होतात. म्हणूनच मुलांच्या महत्त्वाच्या 6 सांसर्गिक आजारांत गोवराचा समावेश केलेला आहे.
3. कांजण्या ( Varicella )
कांजण्या हा प्रामुख्याने लहान मुलांचा आजार आहे. या आजारास व्हॅरिसेला झॉस्टर व्हायरस (Varicella Zoster Virus) हा विषाणू कारणीभूत असतो. त्याच्या संसर्गाने प्रथमत: कांजण्या होतात. हा आजार एकदा येऊन गेला, की परत होत नाही पण रुग्ण बरा झाल्यावर अनेक वर्षे हे विषाणू रुग्णाच्या मज्जासंस्थेत सुप्तावस्थेत जातात आणि त्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती काही कारणास्तव कमकुवत झाली, तर ते पुन्हा कार्यरत होऊन नागीण किंवा परिसर्प (Herpes) या आजाराचे कारण ठरतात.
4. रुबेला ( Rubella )
रुबेला हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे जो त्याच्या विशिष्ट लाल पुरळांनी ओळखला जातो. याला जर्मन गोवर (Jerman Measles) किंवा तीन-दिवसीय गोवर देखील म्हणतात. जरी या संसर्गामुळे बहुतेक लोकांमध्ये सौम्य लक्षणे दिसू शकतात किंवा कोणतीही लक्षणे नसतात, तरीही गर्भधारणेदरम्यान ज्या मातांना संसर्ग होतो अशा न जन्मलेल्या बाळांसाठी ते गंभीर समस्या निर्माण करू शकतात.
रुबेला झालेल्या बहुतेक लोकांना सामान्यत: सौम्य आजार असतो, ज्यामध्ये कमी दर्जाचा ताप, घसा खवखवणे आणि पुरळ उठणे यांचा समावेश असू शकतो जो चेहऱ्यावर सुरू होतो आणि शरीराच्या इतर भागात पसरतो. रुबेला मुळे गर्भपात होऊ शकतो किंवा विकसनशील बाळामध्ये गंभीर जन्म दोष होऊ शकतो जर एखाद्या स्त्रीला गर्भधारणा असताना संसर्ग झाला असेल. रुबेला विरूद्ध सर्वोत्तम संरक्षण म्हणजे MMR (गोवर-गालगुंड-रुबेला) लस.
5. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग ( Cervical Cancer )
गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा एक प्रकारचा कर्करोग आहे जो गर्भाशयाच्या मुखाच्या पेशींमध्ये होतो - गर्भाशयाचा खालचा भाग जो योनीशी जोडतो. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगांपैकी एक आहे. योनीतुन ( Vagina ) गर्भाशयात उघडणारा अरुंद भाग म्हणजे गर्भाशयाचे मुख तिथे या कर्करोगाची सुरुवात होते.
गर्भाशय आणि योनीला जोडणाऱ्या महिलांच्या गर्भाशय ग्रीवामध्ये पेशी बदलतात तेव्हा गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होतो. हा कर्करोग त्यांच्या गर्भाशय ग्रीवाच्या खोल ऊतींवर परिणाम करू शकतो आणि त्यांच्या शरीराच्या इतर भागांमध्ये (Metastasis), बहुतेकदा फुफ्फुसे, यकृत, मूत्राशय, योनी आणि गुदाशयापर्यंत पसरू शकतो.
गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कर्करोगाची बहुतेक प्रकरणे मानवी पॅपिलोमाव्हायरस (HPV) च्या संसर्गामुळे होतात, जी लसीने टाळता येऊ शकते.
6. कॉलरा ( Cholera )
कॉलरा हा आजार व्हीब्रीओ कॉलरा या विशिष्ट जीवाणुमुळे होतो. प्रथमतः जुलाब सुरु होतात व त्यानंतर उलटयाही होतात. कॉलरामध्ये पाण्यासारखे/भाताच्या पेजेसारखे पातळ जुलाब होतात. या आजारामध्ये निर्जलीकरण अत्यंत वेगात होते. कॉलरा (पटकी) ची लागण तुरळक व साथउद्रेक स्वरुपात होते. आजाराचा प्रसार वेगाने होतो.
7. घटसर्प ( Diphtheria )
घटसर्प हा Corney Bacterium Diphtheria नावाच्या जीवाणूमुळे होणारा संसर्गजन्य रोग असून त्यामुळे घसा व टॉन्सिल्स यांचा संसर्ग होऊन त्यावर तयार झालेल्या पडदयामुळे श्वासास अडथळा तसेच मृत्यु होऊ शकतो.
8. इबोला ( Ebola )
इबोला हा फ्लॅव्हीव्हायरेडी या कुलातील विषाणू असून त्याचे पाच मुख्य उपप्रकार आहेत. इबोला विषाणू रोगाचे पहिल्यांदा निदान 1976 मध्ये झाले.
हा रोग मुख्यत्वे चिपांझी, गोरीला व डुकरे यांचा असून अपघाताने माणसांत रोगाचा संसर्ग होतो. प्राण्यापासून हा रोग माणसाला होतो. टेरोपोडिड या जातीच्या वटवाघळामध्ये हा विषाणू निसर्गत: आढळून येतो.
इबोला विषाणू रोग झालेल्या प्राण्याचे रक्त मांस वा इतर स्त्राव यांच्या प्रत्यक्ष संपर्कात आल्याने माणसाला हा रोग होतो. हानीग्रस्त किंवा फाटलेल्या त्वचा किंवा श्लेष्मल आवरणातून विषाणू माणसाच्या शरीरात प्रवेश करतो. त्यानंतर याच पद्धतीने इबोला विषाणू रोग झालेल्या रुग्णापासून इतरांना रोगाचा प्रसार होऊ शकतो.
9. इन्फ्लुएंझा ( Influenza )
इन्फ्लुएंझा हा आजार आरएनए या विषाणूमुळे होतो. हा एक सामान्य संसर्गजन्य आजार असून जो खोकला आणि शिंका याद्वारे पसरतो. हिवाळ्यात ह्या आजाराचे प्रमाण जास्त असते आणि त्यामुळे याला मोसमी फ्लू असेदेखील म्हणतात. आरएनए विषाणू हा श्वसनमार्गाला जास्त परिणाम करतो. इन्फ्लुएंझाचे निराकरण १ आठवड्यात किंवा १० दिवसात सुद्धा होते. ५ वर्षाखालील व ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये इन्फ्लुएंझा हा आजार होऊ शकतो.
थंडी वाजून ताप येणे, डोके व अंग अतिशय दुखणे ही या रोगाची प्राथमिक लक्षणे आहेत. काही वेळा डोकेदुखीमुळे प्रकाश सहन होत नाही. या रोगामुळे लहान मुलांना व ज्येष्ठ नागरिकांना फुफ्फुसशोथ, हृदयाच्या स्नायूंचा शोथ (मायोकार्डायटिस) किंवा मस्तिष्कावरणशोथ (मेनिनजायटिस) होऊ शकतो.
10. जपानी एन्सेफलायटीस ( Japanese encephalitis )
जपानी एन्सेफलायटीस हा जपानी एन्सेफलायटीस विषाणू (JEV) मुळे होणारा मेंदूचा संसर्ग आहे. बहुतेक संक्रमणांमुळे कमी किंवा कोणतीही लक्षणे दिसून येत नसली तरी, अधूनमधून मेंदूला जळजळ होते. या प्रकरणांमध्ये, लक्षणांमध्ये डोकेदुखी, उलट्या, ताप, गोंधळ आणि दौरे यांचा समावेश असू शकतो. हे संक्रमणानंतर 5 ते 15 दिवसांनी होते.
हा सामान्यत: डासांद्वारे पसरतो, विशेषत: क्युलेक्स प्रकारातील. डुक्कर आणि जंगली पक्षी हे विषाणूचा साठा म्हणून काम करतात. निदान रक्त किंवा सेरेब्रोस्पाइनल फ्लुइड चाचणीवर आधारित आहे. सामान्यतः जपानी एन्सेफलायटीस लसीद्वारे प्रतिबंध केला जातो, जी सुरक्षित आणि प्रभावी दोन्ही पण आहे.
11. मेंदुज्वर ( Meningitis )
मेंदूज्वर हे एक गंभीर इन्फेक्शन आहे, ज्याचा मेंदू आणि पाठीच्या कण्याभोवतीच्या संरक्षक थरावर परिणाम होतो. हा आजार बॅक्टेरिया, व्हायरस आणि बुरशीमुळे होतो. मेनिंगोकोकल मेनिंजायटिस (मेंदूज्वर) नायसेरिया मेनिंगिटायडिस बॅक्टेरियामुळे होतो, ज्यामुळे आजाराची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढते. हा आजार श्वसनाद्वारे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित होऊ शकतो.
मेनिंगोकोकल मेनिंजायटिस (मेंदूज्वर) प्रामुख्याने लहान मुलांना होतो आणि जर त्यावर उपचार केले नाही तर मेंदूला गंभीर इजा होऊ शकते.
12. गालगुंड ( Mumps )
विषाणूंच्या संसर्गामुळे माणासाला होणारा एक संसर्गजन्य रोग. पॅरामिक्सोव्हायरस नावाच्या विषाणूंमुळे गालगुंड रोगाचा प्रसार होतो. या रोगात कानाच्या पुढे आणि गालाच्या खालील भागात असलेल्या लाळग्रंथी सुजून खूप वेदना होतात. या रोगाला लाळ पिंडशोथ असेही म्हणतात. गालगुंड झालेल्या व्यक्तीच्या चेहर्यावर जरी एकाच बाजूला सूज दिसत असली तरी बहुतांशी प्रमाणात दोन्ही बाजूंच्या ग्रंथी बाधित होतात. गालगुंड झाल्यास त्याचा संसर्ग शरीराच्या इतर भागालाही होऊन त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे दुसरी लाळग्रंथी, वृषण व अंडाशय, स्वादुपिंड आणि मध्यवर्ती चेतासंस्था इ. बाधित होऊ शकतात.
गालगुंड झालेल्या व्यक्तीच्या लाळेत असलेल्या विषाणूंद्वारे या रोगाचा प्रसार होतो. बाधित व्यक्ती खोकल्यास अथवा शिंकल्यास हे विषाणू हवेत पसरतात आणि इतर (आजूबाजूच्या) व्यक्तीच्या श्वसनमार्गातून शरीरात प्रवेश करतात. बाधित व्यक्तीचे उष्टे पेय किंवा अन्न सेवन केल्यास या रोगाचा प्रसार होतो. १६ ते २१ दिवसांच्या कालावधीनंतर या रोगाची लक्षणे दिसू लागतात. सर्दी होणे, डोके दुखणे आणि ताप येणे ही प्राथमिक लक्षणे असून ताप आल्यानंतर लाळग्रंथी बाधित होतात.
13. डांग्या खोकला ( Pertussis / Whooping Cough )
डांग्या खोकला म्हणून ओळखला जाणारा श्वसनमार्गाचा आजार हा अत्यंत संसर्गिक आजार असून तो Bordetella Pertussis या जीवाणूमुळे होतो. काही रुग्णांमध्ये यामुळे वारंवार खोकला येऊन गिळलेला खाकरा व स्ञाव फुफुसात जावून मृत्यु ओढवू शकतो.
वारंवार येणारा भयंकर खोकला, दोन किंवा अधिक आठवडयांपेक्षा जास्त कालावधीचा खोकला, खोकल्याची तीव्र उबळ, खोकल्यांतरची उलटी, मोठया अर्भकामधील खोकल्याची विशिष्ट उबळ ही याची लक्षणे आहेत.
डांग्या खोकल्याचा जीवाणू रुग्णाच्या नाकातोंडात राहतात आणि खोकल्यातून व शिंकेव्दारे हवेतून सहजपणे पसरतात. लसीकरणाच्या वेळापञकानुसार दिलेले डीपीटी (DPT) लसीकरण डांग्या खोकल्याचा प्रतिबंध करते.
14. फुफ्फुसाचा दाह/न्यूमोनिया ( Pneumonia )
न्यूमोनिया हा फुफ्फुसांचा (Lungs) संसर्ग असलेला आजार आहे. आपल्या शरीरात श्वसनसंस्थेच्या बारीक बारीक नलिका असतात. ज्यांचे काम फुफ्फुसांमध्ये वायूंचे हस्तांतरण करणे असते. पण जर तुमच्या शरीरात न्यूमोनियाकोकस जीवणू ( Pneumococcus Virus) गेला असेल तर ते या कार्यात अडथळा आणण्याचे काम करतात. परिणामी फुफ्फुसांमध्ये द्रव्य (Fluid) साठून राहतो. या द्रव्यामुळे फुफ्फुसांचे कार्य मंदावते. त्यामध्ये कफसारखा (Cough) द्रव्य साचून राहतो. हा त्रास दोन्ही फुफ्फुसांना होऊ शकतो. न्यूमोनिया हे त्या आजाराचे नाव नाही तर हे आजाराचे लक्षण आहे. फुफ्फुसांच्या वायूनलिकेत द्रव्य साचून राहिल्यामुळे या आजारातही श्वसनास अडथळा निर्माण होतो. अपुऱ्या ऑक्सिजनमुळे पेशींचे कार्य नीट होत नाही. जर यामध्ये योग्यवेळी उपचार केले नाही तर रुग्णावर मृत्यूची वेळ ओढावते.
15. पोलिओ ( Polio )
पोलियो अथवा पोलियोमायलिटिस (Poliomylitis) हा एक विषाणूंमुळे बालकांना होणारा आणि अपंग (Deformity) करणारा संसर्गजन्य रोग आहे. पोलिओ (बालपक्षाघात) म्हणजे विषाणूमुळे येणारा लुळेपणा. हा बहुतकरून 2 वर्षाखालील मुलांना होतो. पोलियोच्या उपसर्गाच्या ९०% घटनांमध्ये काहीच लक्षणे आढळून येत नाहीत, परंतु विषाणूनी रक्तप्रवाहामध्ये (Blood Circulation) प्रवेश केल्यास पोलियो रुग्णांमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारची लक्षणे दिसून येतात. १% पेक्षा कमी रुग्णांच्याबाबतीत हा विषाणू मध्यवर्ती मज्जासंस्थेमध्ये (Nervous System) प्रवेश करतो व शरीरातील स्नायूंच्या हालचालीस कारणीभूत असणाऱ्या 'गतिप्रेरक न्यूरॉनना' अपाय करतो. याचे पर्यवसान स्नायू दुर्बल होण्यामध्ये व शेवटी पक्षाघातामध्ये होते.
16. रेबिज ( Rabies )
रेबीज हा उष्ण रक्ताचे प्राणी (विशेषतः की कुत्रा , ससा, माकड, मांजर इत्यादी) चावल्यानंतर होणारा रोग आहे. या रोगामध्ये रोगी पाण्याला घाबरत असल्याने त्यास जलसंत्रास (Water Phobia) असे म्हणतात. रेबीज हा रोग झाल्यास तो प्राणघातक आहे. मात्र रोग होण्यापूर्वी लस देऊन त्यापासून संरक्षण करता येते. रेबीज हा रोग कुत्र्यांनाही होतो. हा कुत्र्यांमुळे माणसात पसरणारा रोग आहे. कुत्रा चावल्यानंतर या आजाराची लक्षणे ९० ते १७५ दिवसात दिसू लागतात. जंगलातले लांडगे जंगली कुत्र्यांना चावतात त्यामुळे जंगली कुत्र्यांना रेबीज होतो. ही जंगली कुत्री गावातल्या कुत्र्यांना चावतात त्यामुळे त्यांना हा रोग होतो. आणि अशी रेबीज झालेली कुत्री माणसास चावल्यास माणसाना हा रोग होतो. कुत्र्याच्या लाळेद्वारे (Dog's Salvia) या रोगाचा प्रसार होतो.
17. रोटा व्हायरस (Rotavirus)
रोटाव्हायरस एक संसर्गजन्य व्हायरस आहे जो पचन संस्थेला (Gastrointestinal System) संसर्गित करतो, ज्यामुळे उल्ट्या (Vomiting) आणि अतिसार होतो. लहान मुले आणि बाळांमध्ये हा आजार सामान्य आहे. पण, लसीकरण अणि वैयक्तिक स्वच्छता पाळून याला प्रतिबंध घातले जाऊ शकते. मुलांचे पोटबिघडण्याचे सर्वात सामान्य कारण या विषाणूचा संसर्ग आहे. दूषित अन्न किंवा पाण्याच्या सेवनानंतर दोन दिवसांनी रोटाव्हायरसची लागण झाल्याची लक्षणे दिसून येतात.
रोटाव्हायरस एक संसर्गजन्य रोग आहे आणि तो पुढील कारणांमुळे पसरतो.
संसर्गित मुलाच्या विष्ठेच्या संपर्कात येणे. संसर्गित माणसाच्या संपर्कात येणे. प्रसाधनगृह, अंथरूण आणि अन्न या सर्वांशी असलेला संपर्क. स्वच्छता न बाळगणे.
18. धनुर्वात ( Tetanus )
मनुष्याला तसेच इतर प्राण्यांना होणारा तीव्र संक्रामक रोग. क्लॉस्ट्रिडियम टेटॅनी (Clostridium Tetani) या जीवाणूंपासून शरीरात तयार होणाऱ्या जीवविषामुळे या रोगाची बाधा होते.ऐच्छिक स्नायूंना (Voluntary Muscle) आकडी येऊन ते ताठरणे हे या रोगाचे वैशिष्ट्य आहे. कोणत्याही प्रकारच्या जखमेतून तसेच अगदी साध्या ओरखड्यातून हे जीवाणू आत शिरू शकतात. ओक्सिजनविरहित (Anaerobic) वातावरण या जीवाणूंच्या वाढीसाठी पोषक असल्याने जखमा व खोल भेगामध्ये सहज वाढतात. विशेषत: मातीत व धुळीत हे जीवाणू मोठ्या संख्येने असतात. गायी, म्हशी, घोडे, कुत्रे इ. प्राण्यांच्या आतड्यांत व विष्ठेतही (Feces) हे जीवाणू असतात. जखमेवर साचलेल्या मातीत धनुर्वाताचे जीवाणू असू शकतात. या रोगाचे संक्रामण रुग्णाच्या संपर्कातून किंवा हवेतून होत नाही.
19. विषमज्वर ( Typhoid )
टायफॉइड हा मराठीत विषमज्वर किंवा मुदतीचा ताप म्हणतात. विषमज्वर हा जीवाणूचा संसर्ग झाल्याने होणारा तापजन्य आजार आहे. ‘सालमोनेला टायफी’ (Salmonella Typhi) या जीवाणूचा संसर्ग झाल्याने विषमज्वर होतो. हा एक संक्रामक आजार आहे.
'सालमोनेला टायफी’ हे जीवाणू रुग्णाच्या शौच आणि मूत्रामधून बाहेर पसरतात. प्रत्यक्ष आजार न झालेल्या वाहक व्यक्तीमधून जीवाणू बाहेर पसरतात. टायफॉइडमधून बरा झालेला रुग्णसुद्धा या जीवाणूचा वाहक(Carrier) असू शकतो. या जीवाणूचा प्रवेश अन्नमार्गात (Food) झाल्याशिवाय टायफॉइड होत नाही. शौचानंतर हात गडबडीने धुणे किंवा हात स्वच्छ न करणे, अशा हातांनी अन्नाचे वाटप करणे ही टायफॉइड होण्याची कारणे आहेत.
शौचावर बसलेल्या माशा उघड्या अन्नावर बसून अन्न दूषित करतात. विषमज्वराचा प्रसार पाण्यातूनही होतो.
20. पीतज्वर ( Yellow Fever )
पीतज्वर हा विषाणूजन्य तीव्र स्वरुपाचा रोग असून एकदम सुरुवात, थकवा, खूप ताप, तापाच्या मानाने मंद नाडी,कावीळ ही त्याची वैशिष्ट्ये होत. गंभीर अवस्थेत रुग्णास रक्ताच्या उलट्या, मूत्रातून प्रथिनांचे उत्सर्जन व कावीळ यांचा त्रास होतो. ईडिस ईजिप्ताय (Aedes aegypti या डासाद्वारे एका रुग्णापासून दुसऱ्यास संसर्ग होतो.
Comments
Post a Comment